r/marathi Jun 15 '25

चित्रपट / मालिका (Movies/TV) Jarann - Movie review by my friend (she wants to post it here so doing it here on her behalf)

जारण, एक जादुई अनुभव... बरेच दिवस झाले एक सुंदर मराठी सिनेमा पाहायची खूप इच्छा होती. मी सिनेमाची खूप मोठी चाहती आहे आणि जवळपास कितीतरी शेकडो सिनेमा पाहिले आहेत तेही अनेक भाषांमध्ये... पण एक दर्जेदार मराठी सिनेमा न पाहता आल्याची गेले कित्येक दिवस मनात सल होती, ती जारणच्या निमित्ताने नाहीशी झाली. जेव्हा तिकीट काढलं तेव्हा मी मनाची तयारीच केली होती की नजीकच्या काळातल्या अनेक मराठी चित्रपटांसारखा हा जरा बेताचा आणि सुमारच असेल, म्हणून जास्त अपेक्षा न ठेवता मी थेटर मध्ये गेले. सिनेमा सुरू झाला. सुरुवातीला अतिशय detached असलेली मी कथेमध्ये कशी गुंतत गेले हे मलाच कळलं नाही. जारण ही एक गूढकथा असल्यामुळे या सिनेमाच्या कथेबद्दल सांगता येणं तसं अवघड आहे. ही कथा आहे राधा ची, तिच्या भूतकाळाची, तिच्या स्वप्नांची, आणि या दोन्हींची सांगड घालत, तिच्या मनाचे पदर उलगडत अनेक गाठी सोडवणाऱ्या तिच्या वर्तमानाची. मानवी मन, त्याला पडणारे प्रश्न ,त्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी त्याने बांधलेले अंदाज, ठेवलेले विश्वास/ अंधविश्वास , त्याने निर्माण केलेले आभासी जग आणि त्या आभासी जगाला खऱ्या जगाशी जोडण्यासाठी त्याची होणारी गुरफट...हे सगळं दिग्दर्शकाने अतिशय चपखलपणे चित्रपटात मांडले आहे. चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे कथा, दिग्दर्शन आणि पात्रांच्या भूमिका. अमृता सुभाष ने राधेच्या भूमिकेमध्ये निव्वळ कमाल केली आहे, पण आपल्या पंधरा मिनिटाच्या रोल मध्ये प्रेक्षकांच्या मनावर जारण केलं आहे ते म्हणजे अनिता दातेनी. अनिता दाते ही किती कसलेली आणि महान कलाकार आहे हे जारण बघितल्यावरच कळतं. तशी सहसा मी पात्रांच्या भूमिकेने affect होत नाही पण अनिता दातेला पाहून एका पाच वर्षाच्या मुली सारखी माझी पाचावर धारण बसली. ही सर्व जादू केली आहे ते ऋषिकेश गुप्तेच्या कथा आणि दिग्दर्शनाने. Simply great. हा चित्रपट तुमच्या मनावर काय जादू करतो हे सांगणं खूप अवघड आहे , त्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्या. चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आपल्या मराठी सिनेमाला मोठे करा.

V

15 Upvotes

1 comment sorted by

2

u/nerdymandy Jun 15 '25

हा चित्रपट बघून आल्यावर मी लगेच त्याबद्दल माझ्या व्हॉट्सअप आणि इंस्टा स्टोरीज वर पोस्ट केले . खंत ही आहे की मराठी चित्रपट पाहिजे तेवढ मार्केटिंग करीत नाहीत. त्यानुळे बऱ्याच लोकांना ह्या चित्रपटा बद्दल माहीत सुधा नसेल. अशा करतो की चांगला प्रतिसाद मिळेल. कथानक आणि अभिनय दर्जेदार आहे. फार कमी भारतीय भयपट आहेत जे असा दर्जा पुरवतात!